साहित्यिकांनी साहित्यनिर्मितीतून समाजाच्या पिढ्या तयार करुन मुल्यवर्धित माणूस उभा केला- प्रा.डॉ. संतोष पवार
जनहित मराठी पाथर्डी प्रतिनिधी (बाळासाहेब कोठुळे)
साहित्यिकांनी साहित्य निर्मितीतून समाजाच्या पिढ्या तयार करून मूल्यवर्धित माणूस उभा केला असे प्रतिपादन श्रीरामपूर येथिल रावबहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालयाचे पदवी व पदव्युत्तर संशोधन केंद्राचे मराठी विभागाचे प्रा. डॉ.संतोष पद्माकर पवार यांनी केले. ते बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभाग व निनाद फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित बिल्वपुरी राष्ट्रीय साहित्य संमेलन व कै.गणपतलाल मुथा राष्ट्रीय काव्यस्पर्धा पारितोषिक वितरण समारंभात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त बीजभाषण करताना बोलत होते.ते पुढे असेही म्हणाले की, आई, आजीच्या ओव्यांनी व पाठ्यपुस्तकातील कवितांनी , कवीवर्य कुसुमाग्रजांसारख्या अनेक साहित्यिकांमुळे भावविश्व समृद्ध होत गेले.संत साहित्याने व मराठी भाषेने अभिरुची वाढत गेली आणि पुस्तकांनी वैचारिक पाया भक्कम केला.गाथासप्तशतीसारखा ग्रंथ दोन वर्षे अभ्यासून प्राकृत भाषा समजून घेतली.संत साहित्य, जैन साहित्य, मुस्लिम साहित्य,ख्रिस्ती साहित्य, बौद्ध वाड्.मयाने ख-या अर्थाने मराठी भाषेला व एकूणच साहित्य जगताला विकसित केले असेही ते म्हणाले.यावेळी व्यासपीठावर बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव अॅड शरद सोमाणी, सहसचिव दिपक सिकची,विश्वस्त बापुसाहेब पुजारी, बाळासाहेब कोठुळे,आत्माराम शेवाळे,धरती जूकर, प्रा.प्रकाश देशपांडे, प्रा.विलास गायकवाड, प्रा.डॉ .अशोक माने, डॉ.मनोज तेलोरे,प्रा. डॉ.बाळासाहेब बाचकर,प्रा.रुपाली उंडे,प्रा.सुनिता पठारे, डॉ.विठ्ठल लंगोटे, प्रा.बाबासाहेब पवार आदि उपस्थित होते.सचिव अॅड शरद सोमाणी या राष्ट्रीय संमेलनास शुभेच्छा देताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी या साहित्य संमेलनांचा, चर्चासत्रांचा व कथाकथनाचा व्यक्तिमत्त्व विकासासाठी फायदा करुन घेतला पाहिजे तर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे म्हणाल्या की, मराठी भाषेला संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम ,संत नामदेवांची,संत एकनाथांची परंपरा आहे.मराठी भाषा ही आईची भाषा असल्याने या मायबोली मराठीतूनच आपण लिहले पाहिजे.स्कंधपुराण ग्रंथात बेलापूरचा बिल्वपुरी असा उल्लेख असल्याने बिल्वपुरी राष्ट्रीय साहित्य संमेलन असा शब्दप्रयोग केला आहे असे सांगून त्यांनी कै.गणपतलाल मुथा राष्ट्रीय काव्यस्पर्धेत देशभरातून सहभागी झालेल्या कवी कवयित्रींचे अभिनंदन केले.मराठी विभाग व निनाद फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष कै.गणपतलाल मुथा राष्ट्रीय खुल्या काव्यस्पर्धेचे आयोजन केले होते.यात देशभरातून ५१ कवितांचे व्हिडिओ आले होते.परीक्षणाच्या प्राथमिक फेरीत प्रा.विलास गायकवाड,प्रा.डॉ.अशोक माने, प्राचार्य प्रो. डॉ.गुंफा कोकाटे यांनी परीक्षण करुन १५ व्हिडिओ निवडले आणि अंतिम फेरीसाठी डॉ.संतोष पवार यांनी परीक्षण करुन निकाल सादर केला.प्रथम क्रमांक सागरराजे निंबाळकर कल्याण, द्वितीय क्रमांक आशुतोष निकम पुणे तर तृतीय क्रमांक धरती जूकर भिवंडी यांनी पटकावला.पारितोषिक विजेत्यांना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले तर सहभागी कवी कवयित्रींना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.सदर संमेलनात डॉ.बाळासाहेब बाचकर यांनी मधु मंगेश कर्णिक यांची ‘मोती’ या कथेचे कथाकथन केले तर कवी संमेलनात धरती जुकर,बाळासाहेब कोठुळे, आत्माराम शेवाळे,सर्वेश्वरी परांजपे,प्रा.सुनिता पठारे यांनी कविता सादर केल्या. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, कवीवर्य कुसुमाग्रजांच्या व कै.गणपतलाल मुथा आणि ग्रंथपुजन व दीपप्रज्वलनाने संमेलनाचे उद्घाटन झाले.सर्व सत्रांचे सुत्रसंचालन डॉ. मनोज तेलोरे यांनी केले तर डॉ.विठ्ठल लंगोटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.संमेलनासाठी सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले.