कांद्याला मिळतोय एक रुपये किलो भाव नुकतीच केंद्र सरकारने कांदा निर्याती वरील स्थगिती उठवली आहे, त्यामुळे आता कांदा चांगल्या दराने विकला जाईल म्हणून कांदा उत्पादक शेतकरी आशेला लागला होता परंतु कांदा बाजारातील सध्यस्थितीत पाहिली तर शेतकऱ्यांच्या आशेची दशा झालेली पाहायला मिळत आहे.
हातगाव ता शेवगाव येथील एका शेतकऱ्याने आपला कांदा घोडेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केट मध्ये विक्री साठी पाठवला होता, या शेतकऱ्याची कांदा पट्टी सध्या सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे, या कांदा पट्टी मध्ये काही कांदे एक रुपया किलो ने विकले गेले,तर काही कांदे तीन रुपये प्रति किलो दराने विकला असल्याचे दिसत आहे.
हातगाव येथून घोडेगाव या ठिकाणी कांदा पोहच करण्यासाठी एका बॅग ला सत्तर रुपये भाडे लागते, एक बॅग सरासरी पन्नास किलो असते म्हणजे किलोला दीड रुपया भाडे आकारले जाते, आणि किलोला दीड रुपया भाडे खर्च करून तिथे नेलेला कांदा मात्र एक रुपया किलो प्रमाणे विकला जात असल्याने शेतकऱ्यांना आपल्या कांद्याचे वाहतूक भाडे सुद्धा पदरून घालण्याची वेळ आली आहे, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
मागील पाच ते सहा महिन्यांपासून केंद्राने कांदा निर्यातीवर निर्बंध घातले होते,ऐन निवडणुकीच्या तोंडावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी निर्यात बंदी उठवल्याचे दाखवले जात असले तरी निर्यात शुल्कामुळे व्यापारी वर्ग कांदा बाहेर पाठवण्यासाठी तयार नाही,
आणि निर्यात चालू झाली म्हणून शेतकऱ्यांनी एकदमच आपला कांदा बाजारात आणण्यास सुरुवात केली त्यामुळे कांदा दर आणखी खाली आल्याचे सांगितले जात आहे.
एकूणच सध्या कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून असीच परिस्थिती राहिली तर झालेला खर्च (कांद्याला आठ ते दहा रुपये किलो प्रमाणे उत्पादन खर्च आहे) निघतो की नाही अशी परिस्थिती कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर ओढवली आहे.