केंद्राने पाच महिन्यांनंतर कांदा निर्याती वरील निर्बंध हटवले कांदा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी डिसेंबर 2023 मध्ये केंद्रं सरकारने कांदा निर्यातीवर निर्बंध घातले होते.या मुळे नोव्हेंबर 2023 मध्ये चार हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंत असणारे कांदा दर निर्यात बंदी नंतर कोसळले होते, या मुळे शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त केली जात होती.
काल शनिवारी केंद्राच्या परदेश व्यापार विभागाचे महासंचालक संतोष कुमार सारंगी यांनी एका अधिसूचने द्वारे निर्यातीवरील निर्बंध शिथिल करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.या अधिसूचना नुसार कांद्यावर 550 डॉलर किमान निर्यातमूल्य लागू केल्याचे म्हटले आहे त्याचबरोबर 40 टक्के निर्यातकरही भरावा लागणार आहे. त्यामुळे निर्यातबंदी उठवल्याचा फायदा शेतकरी तथा कांदा व्यापाऱ्यांना होईल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केंद्राने हा निर्णय घेतल्याचे विरोधकांचे म्हणणे असून या निर्णयामुळे शेतकऱ्यांना काहीही फायदा होणार नसल्याची टिका देखील विरोधकांनी केली आहे.
किमान निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्कामुळे किती प्रमाणात कांदा निर्यात होईल व त्याचा शेतकऱ्यांना किती फायदा होईल हे पुढील पंधरा वीस दिवसांत स्पष्ट होईल.
दरम्यान, केंद्राच्या या निर्णयामुळे घाऊक बाजारात कांदा दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे,काल कृषी उत्पन्न बाजार समिती घोडेगाव च्या कांदा बाजारात कांदा दरात सरासरी पाचशे रुपये ची वाढ झाली असून, पंधराशे रुपये दराने विकणारा कांदा दोन हजार रुपये पर्यंत विकला जात आहे.