सद्गुरू विश्वासनंद महाराज पालखी सोहळ्याचे आज कांबी येथून प्रस्थान
प्रतिनिधी:निलेश ढाकणे
सालाबादप्रमाणे सद्गुरू विश्वासनंद महाराज पालखी सोहळ्याचे आज दि ९ रोजी कांबी ता शेवगाव येथून पिंपरी राजा (ता.जि.संभाजीनगर) साठी प्रस्थान होणार आहे.कांबी येथील सद्गुरू विश्वासनंद महाराज यांनी सन १९१३ मध्ये आपल्या गुरुच्या गावी (पिंपरी राजा) संजीवन समाधी घेतली असल्याचे ग्रामस्थ सांगतात आणि तेव्हा पासून संजीवन समाधी च्या तिथीनुसार हा पालखी सोहळा अविरतपणे सुरू आहे.या वर्षी या पालखी सोहळ्याचे १११ वे वर्षे आहे.
कांबी ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील भाविक मोठ्या भक्तिभावाने या सोहळ्यात सहभागी होतात.नौकरी – व्यवसाया निमित्ताने बाहेरगावी असलेले ग्रामस्थ, त्याचबरोबर लहानपणापासून सोहळा अनुभवलेल्या सासरवासिनी या सोहळ्यासाठी माहेरी येतात,कांबीगावा साठी हा सोहळा म्हणजे भक्तीची-आनंदाची दिवाळीचं!
अशी आहे पालखीची रुपरेषा
दिंडीचा पहिला मुक्काम नांदर येथे होऊन विश्वासनंद महाराज यांची गावातून मिरवणूक काढण्यात येईल. सायंकाळी गणेश महाराज गाडे यांचे कीर्तन होईल. रविवारी सकाळी पालखी सोहळा मार्गस्थ होऊन खादगाव या ठिकाणी पोहोचेल. दुपारी कृष्णा महाराज कुन्हे यांचे कीर्तन होईल. संध्याकाळी आडूळ येथे विक्रम महाराज पुरी यांचे कीर्तन होईल. सोमवारी सकाळी सोहळा पिंप्रीराजा येथे पोहोचेल. बीजेनिमित्त विश्वासनंद
मठाचे महंत प्रल्हादनंद गिरी महाराजांच्या हस्ते श्री विश्वासनंद महाराज समाधीस्थळी अभिषेक व रामेश्वर महाराज देशमुख यांचा संगीत भजनांचा कार्यक्रम होईल.
त्यानंतर आरती होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. संध्याकाळी किशोर महाराज भिसे यांचे कीर्तन व सुवर्णा गिरी व वैजनाथ कोकाटे यांचे ब्रह्मानंदी भजन होईल. मंगळवारी सकाळी दत्तात्रय महाराज बोरकर यांचे कीर्तन व गणेश महाराज आव्हाड यांचे संगीत भजन होऊन पालखी सोहळ्याची पिंप्रीराजा येथे नगर प्रदक्षिणा होईल, संध्याकाळी कबीर महाराज आत्तार यांचे कीर्तन होईल. त्यानंतर गणेश महाराज परिहार यांचा भजनाचा कार्यक्रम होईल. बुधवारी (दि. १३) भाऊसाहेब महाराज पन्हाळकर यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर पालखी सोहळा पुन्हा कांबीकडे मार्गस्थ होईल.
पालखी सोहळा सर्वधर्म समभावाचे प्रतिक:
या पालखी सोहळ्यात कांबी तसेच पंचक्रोशीतील सर्व जाती-धर्मातील भाविक मोठ्या भक्तिभावाने सहभागी होतात.कांबी गावचे ईसाकभाई शेख यांच्या वतीने पिंपरी राजा येथे अन्नदान व्यवस्था सांभाळली जाते, या वर्षी त्यांनी साठ युवा भक्तांचा गट सोबत घेतला असून त्यामाध्यमातून पालखी मधील भाविकांची सेवा केली जाणार आहे, जसे की, स्वयंपाक तयार करणे, पंगतीत वाढणे इत्यादी.
प्रशासनाकडून सहकार्याची अपेक्षा:
या सोहळ्यासाठी संभाजीनगर जिल्हा प्रशासनाकडून फिरते शौचालय तसेच आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात यासाठी.कांबी सह पालखी मार्गावरील विविध गावच्या ग्रामपंचायतीनी लेखी स्वरूपात या बाबींची प्रशासनाकडे मागणी केलेली आहे.त्याचबरोबर हभप डॉ निलेश मंत्री हे देखील प्रशासनाकडे या बाबतीत पाठपुरावा करत आहेत.
प्रतिक्रिया
सोहळ्यामुळे गावात एकोपा आणि समाधान
“शंभर वर्षाची परंपरा असलेल्या या पालखी सोहळ्यामुळे गावात एकोपा टिकून राहिला आहे” सद्गुरू श्री विश्वासानंद महाराज यांच्या भक्तगणात सर्व जाती धर्माचे लोक होते त्यामुळे आज शंभर वर्षांनंतर सुद्धा सर्व जाती धर्माचे लोक या सोहळ्यात मोठ्या भक्तिभावाने सहभागी होतात, त्यामुळे हा पालखी सोहळा सर्वधर्म समभावाचे प्रतिक समजला जातो.”
डॉ अरुण भिसे
(सिताई हॉस्पिटल बोधेगाव)