12 एप्रिल 2024..पाथर्डी प्रतिनिधी/बाळासाहेब कोठुळे
पाथर्डी तालुक्यातील लोहसर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक तथा वर्गशिक्षक महादेव कौसे यांनी ‘अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती, दोन दिसांची रंगतसंगत दोन दिसांची नाती ‘ कवी मंगेश पाडगावकरांच्या कवितेच्या या ओळींचे गायन केले आणि सर्वांच्याच डोळ्याच्या कडा पाणावल्या. शिक्षकांनी अतिशय भावपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांना निरोप दिला.
यावेळी मुक्ताबाई सुपेकर आणि रविंद्र आंधळे या शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना खूप अभ्यास करा मोठे व्हा आणि शाळेचे तसेच आपल्या आई-वडिलांचे नाव कमवा असा मोलाचा सल्ला दिला.
या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन आणि नियोजन इयत्ता चौथीतील चिमुकल्यांनी केले होते. प्रथम त्यांनी सर्व शिक्षकांचा शाल , श्रीफळ देऊन सत्कार केला व शाळेसाठी घड्याळ भेट दिले.
शुभांगी वांढेकर , त्रिशा गिते , मोहिनी वनवे , कावेरी गिते , सार्थक बाठे या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर भाषणे केली . या शाळेचे उपकार आम्ही कधीही विसरणार नाहीत असे सांगितले. शिक्षकांनी आम्हाला दिलेल्या संस्काराची शिदोरी हा आमच्यासाठी अनमोल ठेवा आहे आणि तो आम्ही जपून ठेवू व योग्य वेळी त्याचा वापर करू असे सांगितले.
प्रास्ताविक साई गिते याने केले .सूत्रसंचालन त्रिशा गिते हिने केले तर मयूर वायभासे याने आभार मानले.
आदित्य गिते , आर्यन गिते , साई घुले , सार्थक डोंगरे , तेजल गिते , गायत्री खेडकर , अर्पिता पालवे , श्रावणी शेरकर व काजल वारे हे चौथीतील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात आले.