जनहित मराठी प्रतिनिधी: इमरान शेख गेवराई
कार्यालयीन क्षेत्रभेट या शालेय उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची पोलीस स्टेशन व नगर परिषद येथे भेट
शालेय विद्यार्थ्यांची ‘सहल’ म्हटलं, की डोळ्यासमोर उभी राहतात ती प्रेक्षणीय स्थळे…थंडगार हवेची ठिकाणे… गड – किल्ले , धबधबे, निसर्गरम्य परिसर परंतु, शाळकरी विद्यार्थ्यांना निर्भय बनवणारी ‘कायद्याची सहल’ थेट गेवराई तालुक्याच्या पोलीस ठाण्यात पोहोचली आहे. गेवराई तालुक्यातील बदर इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक सय्यद मोमीन एजाज व शाळेचे मुख्याध्यापक नूर पठाण यांनी शालेय उपक्रमांतर्गत क्षेत्रभेट म्हणून गेवराई पोलीस ठाणे हे स्थळ नियोजित करून विद्यार्थ्यांसाठी ही क्षेत्र भेट यशस्वी घडवून आणली.
यावेळी विद्यार्थ्यांनी पोलीस उप अधीक्षक राजगुरु दोसर यांचेशी थेट संवाद साधून तेथील कामकाजाची प्रत्यक्ष अनुभूती घेतली.
पोलीस ठाण्यात दैंनदिन कारभार कसा चालतो? कायद्याची कलमे, निर्भयतेचे धडे, याबाबत विद्यार्थी माहिती प्राप्त करून घेण्यासाठी अधिक उत्साही झाले होते.
पोलीस स्टेशन मधील पोलीस निरीक्षक पी.वाय. बांगर व सहाय्यक पोलीस निरीक्षक कोतकर साहेब यांनी पत्रव्यवहार कक्ष,गोपनीय अभिलेख कक्ष, वायरलेस कक्ष, संशयित आरोपींची कोठडी इ. दाखवून त्याबाबत सविस्तर माहिती विदयार्थ्यांना दिली. तक्रार कशी नोंदवली जाते ? आरोपीची प्राथमिक माहिती कशी घेतली जाते? त्यावर काय प्रक्रिया होते याबाबत ठाणे अंमलदार राठोड साहेब यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील राठोड यांनी पोलीस दलातील वापरात असलेल्या शस्त्रांची व विविध प्रकारच्या बंदुक, रायफल याबाबतची प्रत्यक्ष माहिती विद्यार्थ्यांंना सांगितली.
पोलीस कॉन्स्टेबल बहिरवाड मैडम यांनी रस्ता वाहतुकीचे नियम, महिला सशक्तीकरण, सायबर गुन्हे याबाबत सविस्तर विश्लेषण करुन विदयार्थांना माहिती दिली.
आज प्रत्यक्ष पोलीस स्टेशन येथे भेट दिल्यामुळे पोलिसांबद्दल असलेली भीती कमी झाली अशा प्रातिक्रिया विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केल्या. तसेच नगर परिषद कार्यालयात देखील प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कार्यालयीन कामकाज कसे चालते ? तसेच कार्यालयांतर्गत इतर उपक्रम व योजना या सर्व बाबींचा आढावा जाणून घेण्याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला. बदर स्कूलच्या वतीने राबविलेल्या या आगळ्या-वेगळ्या उपक्रमांची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.