कविता …
एक कविता अशी स्फुरावी
जी काळजाला छेदून जावी,
ज्ञानेशाची ज्ञानेश्वरी कधी
तुकोबांची गाथा व्हावी…
अनाथांचा नाथ कधी
दिन-दुबळ्यांचा दाता व्हावी,
महापुरुषांच्या विचारापुढे
झुकणारा माथा व्हावी….
एक कविता अशी स्फुरावी
जी समतेचं गाणं गावी,
अल्लाहू-अकबर ची साद कधी
टाळ-मृदुंगा चा नाद व्हावी….
वाहे गुरू चा बंदा कधी
चर्च मधील आराधना व्हावी,
बुध्दाची अमृतवानी कधी
जैन मुनींची साधना व्हावी…..
एक कविता अशी स्फुरावी
जी असा काही भाव खावी,
खस्ता खाणारा बाप कधी
धडपडणारी माय व्हावी….
बहीण भावाचं प्रेम कधी
मित्राची साथ व्हावी,
प्रेमिकेची भेट कधी
अर्धांगिनी थेट व्हावी….
एक कविता अशी स्फुरावी
जी जगण्याचा आधार व्हावी,
मरता-मरता शेवटाला
ओठांवरती तीच यावी…
एक कविता अशी स्फुरावी ,
एक कविता अशी स्फुरावी…एक कविता अशी स्फुरावी…
-रामदास ज्ञानदेव घोडके (.पाटेगाव,ता.पैठण)
मो.नं.7218856504